प्रशासकीयब्रेकिंग न्युज

वन्यजीव सप्ताहानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांच्या शुभेच्छा

आठवडा विशेष टीम―

मुंबई,दि. 1 – दि. 1 ते 7 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात श्री. राठोड म्हणतात, या सप्ताहानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण व संवर्धन यासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग व सहकार्य यानिमित्ताने मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो. राज्यात 6 राष्ट्रीय उद्याने, 6 व्याघ्र प्रकल्प व 6 राखीव संवर्धन क्षेत्र, 49 अभयारण्ये आहेत. या संरक्षित क्षेत्रांमध्ये वनाचे व वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण केले जाते. मागील काही वर्षांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली वाढ ही आपल्या राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. राज्यातील वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी वनविभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. संरक्षित क्षेत्राजवळ असणाऱ्या विविध गावांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शास्त्रीय अभ्यास करण्याबरोबरच वाहन असेल, उच्च दर्जाचे साहित्य असेल किंवा प्रशिक्षित मनुष्यबळ असेल हे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वन विभाग काम करीत आहे.

वन्यजीव संवर्धन तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी व वन्यजीव व्यवस्थापनासाठी भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून या संस्थेमार्फत आपण संशोधनाची सुद्धा मदत घेत आहोत. वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प, वन्यजीव अधिवास योजना राज्यात राबवित आहोत.

राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या किनारपट्टीवर कांदळवन क्षेत्र असून मागील काही वर्षांपासून या कांदळवन क्षेत्रात वाढ झालेली आहे, हीसुद्धा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कांदळवन क्षेत्रांमध्ये वन्यजीवांचा उत्तम अधिवास निर्माण करण्याच्या दृष्टीने कांदळवन फाउंडेशन प्रयत्न करीत आहे. येथील जैवविविधता संरक्षण करण्यासाठी कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानमार्फत प्रयत्न सुरू आहेत.

राज्यातील नांदूर-मध्यमेश्वर अभयारण्य ही रामसर साइट म्हणून मान्यता मिळालेली आहे. तसेच राज्यात ग्लोरी ऑफ अल्लापल्ली, गणेशखिंड गार्डन पुणे तसेच लांडोरखोरी जळगाव ही ठिकाणे जैविक वारसाक्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत.

वन्यजीव वविशेष करून तृणभक्षी प्राण्यांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी आपण कॅम्पा योजनेमधून वनचराई क्षेत्र व कुरण विकास योजना राबविणार आहोत.

वन्यजीवांना सर्व हंगामांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनक्षेत्रामध्ये वन तलाव, वन बंधारे हे कॅम्पा निधीमधून निर्माण करणार आहोत. वन्यजीवांना योग्य वेळी व योग्यठिकाणी उपचार मिळावेत म्हणून 11 वनवृत्तामध्ये प्राणी बचाव पथक व वन्यजीव उपचारकेंद्र सुद्धा उभारण्यात येत आहेत. वन्यजीव-मानव संघर्ष कमी व्हावा म्हणून संयुक्त वन हक्क व्यवस्थापन समितीमार्फत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना राज्यामध्ये राबवित आहोत तसेच वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 ची कडक अंमलबजावणी आपण करीत आहोत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.