आठवडा विशेष टीम― अमरावती, दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त जिल्ह्यात आज ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. यानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पाच तास सूतकताईचा कार्यक्रम झाला.
महात्मा गांधी यांनी जगाला सत्याग्रहाचा मार्ग दाखवून सत्य, अहिंसा आणि मानवता या मूल्यांसाठी आयुष्य वेचले. त्यांचे विचार कायम प्रेरणा देणारे आहेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा देत ती कृतीतूनही सिद्ध केली. भारतमातेच्या या दोन्हीही सुपुत्रांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अतुलनीय आहे. देशावर आलेल्या आपत्तीचा सामना धैर्य, संयम व विवेकाने करण्याचा मार्ग या महापुरूषांनी दाखवला आहे. त्यांचे कृतीत उतरवून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण योगदान देऊया, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनीही टोंगलाबाद येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त संजय पवार, प्रमोद देशमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनाही अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे व विविध अधिकारी, तसेच कर्मचारी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सलग पाच तास सुत कताईच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अमरावती कार्यालय व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजयंतीनिमित्त २५ चरख्यांवर सलग पाच तास सूत कताई करून महात्मा गांधीना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.
कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या वतीने मागील ५ वर्षापासून देशातील पहिला विकेंद्रित सोलर चरखा प्रकल्प अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील २५० महिला सोलर चरख्यावर सुत कताईच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनल्याअसून मागील पाच वर्षापासून कापूस ते कापड उत्पादन साखळी अमरावती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
येथील औद्योगिक वसाहतीतील कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या मुख्यालयात आज हातचरखा, पेटी चरखा, अंबर चरखा ,सोलर चरखा आदी विविध २५ चरख्यांवर सलग पाच तास सुत कताई करण्यात आली. यावेळी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर आणि रजिस्टार तुषार देशमुख यांनी भेट देऊन सुत कताईच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली अर्पण केली.
यावेळी जिल्हा ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी प्रदीप चेचरे तसेच संस्थेच्या अध्यक्ष रुपाली खडसे, सचिव प्रणिता किडीले, उपाध्यक्ष कल्पना शेंडोकार तसेच समितीच्या महिला सभासद मंजू ठाकरे, वर्षा जाधव, वैशाली राजुरिया आणि समितीचे कर्मचारी नेत्रदिप चौधरी, सुमित नागपुरे , अजीम शेख, नीलकंठ पांडे,उमेश साखरकर , शीतल चौधरी, अश्विनी देशपांडे, किर्ती सोनटक्के, मयुरी खरबडे , पूजा यादव आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.