बीड: कौटुंबिक न्यायालयांमध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे ― व्ही.व्ही. कंकणवाडी

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

बीड,दि,०२ :- कौटुंबिक न्यायालयामध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी केले.

बीड येथील कौटुंबिक न्यायालयाचे आभासी उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांच्या हस्ते बीड येथील न्यायालयात आयोजित कार्यक्रमात संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या उद्घाटन समारंभास प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत महाजन, कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश सानिका जोशी आणि बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिनेश हंगे उपस्थित होते.

पुढे बोलताना न्यायमूर्ती कंकणवाडी यांनी सांगितले की पती-पत्नीमध्ये वाद मिटवण्यासाठी विलंब झाल्यास त्यातील कटुता आणखी वाढू शकते त्यामुळे घर जोडण्याचे काम अपेक्षित आहे. तेव्हा मुदतीवर मुदत घेणे चालणार नाही, पती-पत्नी यांच्या वादात दोन घरेही भरडली जातात तसेच मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाची भूमिका महत्त्वाची आहे.

beed family court inaugration 1

उद्याच्या नागरिकांवर चांगले संस्कार होणे अपेक्षित आहे. तरच उद्याचा भारत सुजाण नागरिकांचा देश होईल सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपण एकत्रित काम करावे, समाज बळकटीकरण करणे हीच काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, पूर्वी कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे निपटारा करण्यास विलंब लागत होता परंतु आता कौटुंबिक न्यायालयामुळे कौटुंबिक प्रकरणे सोडवण्यास विलंब लागणार नाही. तसेच भारतीय राज्यघटनेने स्त्रियांच्या बाबतीत केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊन स्त्रियांचे हक्क कुटुंबव्यवस्था मजबूत होणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिनेश हंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती भाटिया दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी केले तर आभार कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश सानिका जोशी यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमास न्यायालय व्यवस्थापक, कर्मचारी तसेच विधिज्ञ उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.