वर्धा: गांधीजींच्या विचारधारेचे अनुसरण करुया – पालकमंत्री सुनील केदार

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

वर्धा, दि.2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांची दैनंदिन जीवनपद्धती हीच इतरांसाठी तत्त्वज्ञान बनविले. त्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीचे, सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाच्या विचारधारेचे अनुसरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे ,असे प्रतिपादन राज्याचे पशु संवर्धन, दुग्ध व्यवसायविकास, मत्स्य विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती सप्ताहानिमित्त सेवाग्राम येथील बापूकुटी आश्रमात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वोदय मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने गांधी चौक ते सेवाग्राम आश्रम पर्यंत सकाळी ७ वाजता पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेचा समारोप सेवाग्राम आश्रमात झाला. यावेळी सेवाग्राम आश्रमाच्या वतीने महात्मा गांधी यांचे देशाला उद्देशून केलेले पहिले भाषण आणि सेवाग्राम येथे आल्यानंतर गावातील नागरिकांना उद्देशून केलेले भाषण अशा दोन ध्वनिफितीचे विमोचन पालकमंत्री आणि उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रणजीत कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बढे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, निवासी उपल्हाधिकारी सुनील कोरडे, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, आशा बोथरा, सेवाग्रामच्या सरपंच श्रीमती सुजाता ताकसांडे, चंदन पाल उपस्थित होत्या.

महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती साजरी करण्यात येत असून, कोविड१९ महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता बापूंच्या विचारांचे काटेकोरपणे पालन करणे, महात्मा गांधी यांच्या जीवनपद्धतीचे, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून, त्यांचा प्रत्यक्ष जीवनात अंगिकार करणे, हेच खरे अभिवादन ठरेल असे श्री. केदार म्हणाले. “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीनुसार त्यांनी संपूर्ण आयुष्य काढले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी जगभरातून गांधीप्रेमी सेवाग्रामातील आश्रमाला भेट देतात. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या विचारप्रेरणेतून जीवनपद्धती बनवूया आणि कोविड१९ला सामोरे जावूया, असे आवाहन पालकमंत्री सुनील केदार यांनी उपस्थितांना केले.

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू. यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आलेल्या सर्वांनी त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घ्यावी. येथे कोविड १९ च्या मर्यादा पाळून सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून

गांधीजींना समजून घेणे आणि त्यांच्या विचारांची कास धरून वाटचाल करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. गांधीविचार जगाला विनाशापासून तारू शकणार आहेत. सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाचे प्रत्येक नागरिकाने पालन करावे, असे आवाहन श्री. प्रभू यांनी केले.

पालकमंत्री सुनील केदार यांनी बापूकुटीत जावून अभिवादन केले आणि प्रार्थना केली. त्यानंतर आश्रमवासी जालंदर नाथ यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी यांच्या विविध मूर्ती, बापू कुटी, आश्रम, त्यांच्या पादुकांची तसेच मी पासून, आम्ही आणि आम्हीपासून जगाकडे जाण्याचा संदेश देणा-या चित्रसंदेशाची पाहणी केली.

minister sunil kedar 2

पदयात्रेला पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडून हिरवी झेंडी

सकाळी ७ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी गांधी पुतळ्यापासून सुरु झालेल्या प्रभातफेरीला हिरवी झेंडी दाखवली. वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ राष्ट्र सेवा दलाची प्रभातफेरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून सुरु झाली.

आमदार रणजीत कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, तहसीलदार प्रिती डूडूलकर उपस्थित होते.

“वैष्णव जन तो तेने कहिये,

जे पीड परायी जाणे रे ।

पर दुःखे उपकार करे तो ये,

मन अभिमान न आणे रे ॥

॥ वैष्णव जन तो तेने कहिये..॥”, दे दी हमे आजादी

बिना खडग, बिना ढाल

साबरमती के संत तुने कर दिया कमाल आदी भजने गात गांधीप्रेमींनी माझे कुटूंब माझी जबाबदारी चे फलक हातात घेऊन प्रभातफेरीला सुरुवात केली. सकाळी ७ वाजता निघालेली प्रभात फेरी ९ वाजता सेवाग्राममधील आश्रमात पोहचली.

गांधीजींच्या वेषभूषेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांची धारण केलेली वेषभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

देवळी येथील एस.एस. एन जे महाविद्यालयाचे प्रा. गिरीश काळे व प्रा. मोहन गुप्परकर यांच्या मार्गदर्शनात महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत विवेक दोंडल, लोकमान्य टिळक राजेश सूरजुसे, छत्रपती शिवाजी महाराज आकाश भट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रघू सोलंकी, सुभाषचंद्र बोस तुषार झाडे, पंडीत जवाहरलाल नेहरू प्रतिक वालूकार, राजगुरु संकेत हिवंजे, राणी लक्ष्मीबाई दीक्षा माहेश्वरी, आणि राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत धनश्री खेळकर या विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.