Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
सिंधुदुर्गनगरी दि. २ : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे आज आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, संदेश पारकर, संजय पडते यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोविड – 19 चा सामना करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे सांगून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यावेळी म्हणाले की, सध्या जिल्ह्यामध्ये खाटांची उपलब्धता चांगली आहे. या खाटांच्या संख्येमध्ये नजीकच्या काळात आणखी वाढ होणार आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्हा ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. रुग्णांना चांगल्या सुविधा देणे हे आमचे ध्येय असून त्यासाठी लागणारी सर्व सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल असे आरोग्य राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हा 6 किलो लीटरचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. 72 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे एकावेळी 58 जंम्बो सिलेंडर्स जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपलब्ध होणार आहे. यावेळी आरोग्य राज्यमंत्री श्री. पाटील यांनी कोविड – 19 वॉर्डला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.