आठवडा विशेष टीम― अमरावती, दि. ५ : दृश्यकलेचा जनमानसावर मोठा प्रभाव असतो. सामाजिक प्रश्नाची जाणीव करून देणे, नागरिक म्हणून असलेली जबाबदारी व संवेदनशीलता टिकवून ठेवणे यासाठी चित्रपट कला प्रभावी असते. त्यामुळे सामाजिक आशयाच्या अधिकाधिक कलाकृती पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
नरेंद्र भुगूल निर्मित ‘लाईफ गार्डन’ या टेलिफिल्मचे लोकार्पण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते शासकीय विश्रामभवन येथे करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
समाजाची संवेदनशीलता टिकून राहण्यासाठी सामाजिक आशयाच्या कलाकृतींची गरज पालकमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली. श्री. भुगुल यांनी सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणाऱ्या टेलिफिल्मची उत्कृष्ट निर्मिती केल्याबद्दल भुगूल यांचे त्यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी टेलिफिल्मचे दिग्दर्शक, निर्माते नरेंद्र भुगूल यांच्यासह संध्या भुगूल, प्रविण भुगूल, वैष्णवी ठाकूर व जयेश सरोदे उपस्थित होते.