आठवडा विशेष टीम―वर्धा, दि ५ :- एमगिरीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून वर्धा जिल्ह्यातील किमान १० हजार लोकांना काम देऊ शकू असा प्रकल्प तयार करावा, तसेच वर्ध्यातील खादी, गोरस पाक यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि ब्रँडिंग केल्यास आणि निर्यात केल्यास या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, असा विश्वास केंद्रीय लघु,सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास व संभावना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन एमगिरीच्या सभागृहात आज करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, एमगिरीचे संचालक आर के गुप्ता, आमदार पंकज भोयर, सल्लागार परिषदेचे सदस्य श्री काळे, मगन संग्रहालय संचालक विभा गुप्ता उपस्थित होत्या.
गावातील शेतकरी, मजूर, बेरोजगार युवक यांना गावातच रोजगार देणे आणि गाव स्वयंपूर्ण करणे हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. त्यासाठी वर्धेत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करू शकणारे तंत्रज्ञान विकसित करणे आणि ते गावापर्यंत पोहचवणे यासाठी एमगिरीची स्थापना करण्यात आली. एमगिरी ने ग्रामीण भागात उद्योगाला चालना मिळेल असे विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे मात्र ते ग्रामीण भागापर्यंत पोहचले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी एमगिरीने पुढाकार घ्यावा त्यांना केंद्र सरकार सर्व सहकार्य करेल अशी हमी त्यांनी दिली. वर्धेतील ड्रायपोर्टचे काम पूर्ण होऊन ते सुरु झाल्यास जिल्ह्यातून 2 हजार कोटी रुपयांची भाजी एक्स्पोर्ट करता येईल. घरातील कचऱ्यापासून घराघरात खत निर्मिती करता आली तर शेतकऱ्यांना रासायनिक खतापासून मुक्ती देता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री केदार यांनी या कार्यक्रमाला ऑनलाइन मार्गदर्शन केल्याबाबत नितीन गडकरी यांचे आभार मानले. एमगिरी ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा आणि त्यांच्या जवळील ज्ञानाचा विस्तार केला तर ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पनात वाढ होण्यास मदत होईल. आपण विकसित केलेले संशोधन लोकांपर्यंत पोहचवावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्ह्यात सेंटर ऑफ एक्सलंस आणि रिसोर्स सेन्टरचा केंद्र शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती श्री गडकरी यांना केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातील लोकांकडे कौशल्य आहे, मात्र त्यांच्याशी निगडित शैक्षणिक प्रमाणपत्र नाहीत आणि त्यामुळे त्यांना एखादा उद्योग सुरू करण्यास अडचणी येतात. अशा व्यक्तींना आपल्यामार्फत त्यांची परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देता आले तर अशा अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील असे विचार मांडले.
या कार्यशाळेत तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणात विविध तज्ञांनी मार्गदर्शन करून तंत्रज्ञानाची माहिती दिली.