वरळी किल्ला सुशोभीकरण, संवर्धनाबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ५ : येथील वरळी किल्ला सुशोभीकरण व संवर्धनाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

मुंबई महापालिका, राज्य पुरातत्व संचालनालय आणि पर्यटन विभाग यांच्यामार्फत यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना श्री.ठाकरे यांनी यावेळी केली.

बैठकीस माजी राज्यमंत्री सचिन अहीर, माजी आमदार सुनिल शिंदे, नगरसेविका हेमांगी वरळीकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

किल्ल्याचे जतन, संवर्धन करणे तसेच किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या अनुषंगाने त्यावर प्रकाशझोत टाकणे (illumination) आदी कामांसाठी दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महापालिका आणि राज्य पुरातत्व संचालनालयामार्फत ही कामे करण्यात येतील. यासंदर्भात पाठपुरावा करुन हा प्रस्ताव मान्य करणे तसेच त्याप्रमाणे किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे करण्यात यावीत, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या वैभवात भर घालू शकणाऱ्या वरळी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. याअनुषंगाने जेट्टी तयार करुन वांद्रे ते वरळी किल्ला बोटसफरही सुरु करता येईल. यातून स्थानिकांना, मच्छिमारांना रोजगार देता येऊ शकेल.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.