छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील कोविड हॉस्पिटलचे काम जवळपास पूर्ण

आठवडा विशेष टीम―

सातारा दि.५: छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पीटलचे काम अंतिम टप्यात आले असून या कामाची पहाणी आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. कोविड हॉस्पीटलचे उर्वरित कामे तातडीने करुन रुग्णांच्या सेवेसाठी कोविड हॉस्पीटल लवकरात लवकर आणा असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

या पाहणी प्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

राज्यात काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य शासनाने जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला आहे. काही सामाजिक संस्था, स्वयंसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एक कोरोना हॉस्पीटल असावे सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रालयात कोविड हॉस्पीटल उभारण्यासाठी मान्यता देवून सर्व ते सहकार्य केले. या हॉस्पीटलमध्ये 234 ऑक्सीजन बेड व 52 आयसीयु बेड असणार आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बांधकाम व विद्युत सुविधेसाठी 5 कोटी 92 लाख 70 हजार, वैद्यकीय उपकरणांसाठी 6 कोटी 84 लाख 97 हजार 2061 रुपये तर मनुष्यबळ व इतर गोष्टींसाठी 6 महिन्यांसाठी 13 कोटी 99 लाख 32 हजार इतका खर्च करण्यात आला आहे. रुग्णांची तपासणी करुन या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोविड हॉस्पीटल उभारणीसाठी राज्य शासनाबरोबर स्वयंसेवक, उद्योगांनी मदत केली आहे. अशा या कोविड हॉस्पीटलचे उद्घाटन 9 तारखेच्या दरम्यान होणार असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझमा दान करावे – पालकमंत्री श्री. पाटील

जिल्ह्यातील बरेच कोरोना बाधित रुग्ण आज बरे होवून घरी गेले आहेत. या रुग्णांमध्ये कोरोना विषाणुपासून लढण्यासाठी ॲन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात. या ॲन्टीबॉडीज प्लाझमाच्या उपचार पद्धतीने गंभीर कोरोना बाधितांवर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतो. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लाझमा दान करावे तसेच मीही कोरोनातून बरा झालो आहे मी ही प्लाझमा दान करायची इच्छा जाहीर केली असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

आ.मकरंद पाटील ही प्लाझमा दान करणार

मलाही कारोना संसर्ग झाला होता. आज मी पूर्णपणे बरा झालो आहे. नागरिकांनी कोरोना विषयी कुठल्याही प्रकारची भिती बाळगु नये. प्लाझमा उपचार पद्धती कोरोना झालेल्या रुग्णांसाठी खुप उपयोगी पडत आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्लाझमा दान करावे. मीही प्लाझ्मा दान करणार असल्याचेही त्यांनी कोविड हॉस्पीटलच्या पाहणी प्रसंगी आ.मकरंद पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.