भारतीय लष्कराकडून जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या १४ जणांसह १८ दहशतवादी ठार

नवी दिल्ली दि.११ (वृत्तसंस्था) : पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवले आहे. गेल्या २१ दिवसांमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये ११ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.
जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफचे अधिकारी आणि लष्कराचे वरीष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ढिल्लोन यांनी सांगितले की, “गेल्या २१ दिवसांमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पुलवामा हल्ल्यामागचा सूत्रधार मुदस्सीर अहमद याला ठार करण्यात आले आहे. त्यानेच भारतात घुसखोरी करून पुलवामा हल्ल्याचा कट रचला होता.”
केजेएस ढिल्लोन यांनी सांगितले की, ठार केलेल्या १८ दहशतवाद्यांपैकी १४ जण जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते. तर त्यापैकी ६ जण हे जैशचे टॉपचे कमांडर होते. लष्कराकडून गेल्या ७० दिवसांपासून कारवाई सुरु आहे. या ७० दिवसांत आपल्या जवानांनी ४४ दहशतवाद्यांना ठार केले आहे.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन असल्याची माहिती ढिल्लोन यांनी दिली. त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये पाकिस्तानी सैन्याने १६२९ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं होत. या वर्षी हे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानने ४७८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.