आठवडा विशेष टीम―
श्री.सामंत यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन वॉर रूमची पाहणी केली, त्यानंतर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. राजश्री देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या अंतिम वर्ष, एटी-केटी, बॅकलॉगच्या ऑनलाइन-ऑफलाईन परीक्षेसंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी मंत्री सामंत यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी शुक्रवारी घेतलेल्या ऑनलाईन व ऑफलाईनच्या सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्याचेही सांगितले. त्यावेळी मंत्री सामंत यांनी सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनास दिले. विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा व्हायरसच्या अटॅ्कमुळे पुढे ढकलाव्या लागल्या. याबाबत काही शंका असल्यास सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी, अशा सूचनाही श्री.सामंत यांनी दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकासाठी अडीच कोटींचा निधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारक विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील दीड कोटी रुपये शासन तर 1 कोटी रुपये विद्यापीठ खर्च करणार आहे. अधिकचा निधी लागला तर जिल्हा नियोजन समितीतून घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा केल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. याचबरोबर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा बसवेश्वर यांची अध्यासन केंद्र स्थापन करून अभ्यासकांना संशोधनासाठी संधी दिली जाणार आहे, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा व स्मारक आणि अध्यासन केंद्र याविषयी कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला.
000000
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली माहिती
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विद्यापीठ परिसरात पुतळा उभारणार, त्यासाठीचा खर्च राज्य शासन आणि विद्यापीठ संयुक्तरित्या करणार.
- पुतळ्याचे भूमीपुजन याच महिन्यात करण्याचा राज्य शासनाचा मानस.
- विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन सुरु करणार.
- विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करणार.
- रत्नागिरी आणि सोलापूर येथे पुढील शैक्षणिक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणार.
- तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांच्या थकित वेतन अदा करण्यासाठी निधीची तरतूद करणार.
- तासिका तत्वावर भरतीसाठी सेट नेट उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार.
- प्राध्यापकांची कायमस्वरुपी भरती करता यावी यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार.