आठवडा विशेष टीम―
आळंदी, लेण्याद्री, पंढरपूर, एकवीरा आणि जेजुरी येथील देवस्थान परिसरातील भाविकांसाठीच्या सुविधा, पुरातत्व विभागाकडे असलेले प्रलंबित प्रश्न याबाबत ऑनलाईन आढावा बैठक विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जुन्नरचे लेण्याद्रीचे तहसिलदार हणमंत कोळेकर, मावळचे तहसिलदार श्री. बर्गे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने, तेजस्विनी आखळे उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लेण्याद्री परिसरात भाविकांना मुख्यत्वे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह वापरासाठी उपलब्ध होतील यासाठी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच, रोप-वे साठी हेलिपॅड जिथे आहे त्या परिसरात जागेसाठीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. रोप वे किंवा एलिव्हेटर यापैकी सुरक्षेच्या दृष्टीने काय योग्य ठरेल याचा अभ्यास करूनच पुढील प्रस्ताव सादर करावा, अतिक्रमण केलेल्या दुकानांवर विहित कार्यपद्धतीने कारवाई करावी.
लेण्याद्री परिसरात पिण्याच्या पाण्याची जोडणी तातडीने देण्यात यावी. स्वच्छतागृहाच्या जागेसाठीच्या वादासंदर्भात देवस्थान, स्थानिक आदिवासी आणि पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाने 15 दिवसांत सुनावणी घेऊन अहवाल सादर करावा. विश्रामगृहे बांधण्यासाठीच्या उपाययोजना आखून अहवाल सादर करावा असे निर्देशही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पंढरपूर देवस्थानासंदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर मजबुतीकरणाचे काम करावे. स्कायवॉक, स्वच्छतागृह, विश्रामगृह, दर्शनमंडप यासंदर्भातील कामे दर्जेदार करण्यात यावीत. आळंदीसंदर्भात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीसंदर्भात अहवाल तातडीने सादर करण्यात यावा. याचबरोबर जेजुरी देवस्थान येथील विकासकामांना देखील गती देण्यात यावी. राज्यातील देवस्थानात भाविकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून, त्यासाठीच्या कामांना गती द्या. या कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येणार असल्याचेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.