ओबीसी  समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि. ९: ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

आज ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पूर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करताना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत. मुख्यमंत्री म्हणाले की, टप्प्याटप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि त्यामुळे कामांची गती मंदावून आरोग्य या विषयाची प्राथमिकता वाढली. आता आपण अनलॉक प्रक्रियेमध्ये जीवनाला पुन्हा गती देत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बैठकीत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसेच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह उपस्थित ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.