आठवडा विशेष टीम―
वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावातील मागासवर्गीय महिलांद्वारे सोलर पॅनल निर्मिती केली जाते. उमेदच्या महिला बचतगटांनी एकत्र येऊन 2018 मध्ये को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आय. आय. टी. मुंबईच्या माध्यमातून महिलांना तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देऊन या उद्योगाला जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी सुद्धा दिला होता. महिलांनी राजस्थान मधील डुंगरपूरच्या दुर्गा सोलर एनर्जी कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतले. या उद्योगात 214 महिलांचा समभाग असून यातील 40 महिला सोलर पॅनल निर्मिती करण्यात तरबेज झाल्या आहेत. तसेच इतर महिला पॅनलची उभारणी, मार्केटिंग आणि लेखा विभागाचे कामकाज सांभाळतात. या सर्व महिला तांत्रिकदृष्ट्या एखाद्या अभियंत्याप्रमाणे काम करतात.
सोलर पॅनल व पथदिव्यांची मेडा अंतर्गत नोंदणी न झाल्यामुळे या महिला उद्योजकांना मोठे प्रकल्प मिळत नाही अशी बाब महिलांनी सांगितल्यावर पालकमंत्र्यानी त्यांच्या उत्पादनाची तात्काळ नोंदणी करण्याचे आदेश दिलेत. तसेच अपारंपारिक ऊर्जा निर्मिती अंतर्गत मोठ्या प्रकल्पामध्ये राज्यभरात या महिला उद्योजकाना प्राधान्य देण्याचेही त्यांनी सांगितले. महिलांद्वारे सोलर पॅनल तयार होणाऱ्या फॅक्टरीचे उदघाटन मंत्री महोदयांनी करावे अशी विनंती महिलांनी केली असता हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते फॅक्टरीचा शुभारंभ करण्याची हमी त्यांनी महिलांना दिली.
यावेळी संगीता वानखेडे व महिलांनी पालकमंत्री श्री केदार यांना उद्योगासंबंधी माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उमेदच्या जिल्हा समन्वयक स्वाती वानखेडे मेडा चे अधिकारी उपस्थित होते.