तन-मनाच्या आरोग्यासाठी विवेदा द वेलनेस व्हिलेज उपयुक्त

आठवडा विशेष टीम―

नाशिक दि.9 ऑक्टोबर 2020: आयुर्वेद, नॅचरोपॅथी व होमिओपॅथी अशा चिकित्सांच्या माध्यमातून तन-मनाच्या आरोग्यासाठी विवेदा द वेलनेस व्हिलेजचे नैसर्गिक वातावरण अतिशय उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

बेझे फाटा (त्र्यंबकेश्वर) येथे आज गौतमी गोदावरी प्रकल्पातील ‘विवेदा द वेलनेस व्हिलेज’ प्रकल्पाला भेट दिली त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, विवेदा द वेलनेस प्रकल्पाचे संकल्पनाकार किरण चव्हाण, प्रकल्प संचालक राजेंद्र वानखेडे, उमेश भदाणे, एस. एस. पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील अनेक पर्यटन ठिकाणांमध्ये विवेदा द वेलनेस व्हिलेज या ठिकाणाची भर पडली आहे. या प्रकल्पाच्या बांधकामात नैसर्गिक साधनांचा वापर करण्यात आल्याने येथे सकारात्मक ऊर्जा जाणवते. तसेच निसर्गाच्या पाच तत्वांचा वापर अतिशय योग्य पध्दतीने याठिकाणी करण्यात आल्याने निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव व आनंद या प्रकल्पात घेता येतो. विविधतेने नटलेल्या या संकल्पनेमुळे नाशिकची नवीन ओळख निर्माण होणार आहे, असेही मत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

या व्हीलेजमध्ये योग साधना, मेडिटेशनच्या माध्यमातून विविध व्याधींवर डॉक्टरांचा दिला जाणारा सल्ला आणि येथील प्राकृतिक वातावरण यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आणि शरीराचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येथे राहण्यासाठी यावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी केले.

याठिकाणी अत्याधुनिक साधन सामुग्रीचा वापर करण्यात आला असून या प्रकल्पात केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम केले जाते, अशी माहिती यावेळी प्रकल्पाचे प्रमुख श्री. चव्हाण यांनी दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.