कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – उद्धव ठाकरे

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

वाशिम, दि. १० : कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर सहभागी झाले होते.

xWashim RT PCR Lab Inuagaration 10.10

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा राज्यात केवळ एक-दोनच विषाणू चाचणी प्रयोगशाळा होत्या. आता राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसार वाशिम येथे विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारणीची मागणी आज पूर्ण झाली. या प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून चाचण्यांची संख्या वाढवावी. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचणीची सुविधा, उपचार केंद्रांची संख्या वाढविली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून लोकांची आरोग्य तपासणी करतो आहोत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आलेख कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना बाधितांसाठी मोठ्या प्रमाणात बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, त्याचा वापर करण्याची वेळ येवू नये, अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र मेहनत करीत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. नागरिकांनी सुद्धा कोरोनाला दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत काही प्रमाणात बदल केल्यास कोरोनाला रोखणे सहज शक्य असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात ४०० पेक्षा अधिक विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ह्या प्रयोगशाळा होत आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांनी या प्रयोगशाळेसाठी सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रयोगशाळेमुळे चाचण्यांची गती आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढेल. जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा केवळ १ टक्का आहे, ही चांगली बाब आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सच्या प्रमाणात फक्त ७ टक्के रुग्ण भरती आहेत, तर ९३ टक्के बेड्स रिकामे आहेत, ही चांगली बाब आहे.

जिल्ह्यात जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा, असे सांगून श्री. टोपे म्हणाले, १३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लँट जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात उभारण्यात यावा. त्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात साठवणूक करता येईल, तसेच रुग्णांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होईल. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी. खासगी कोविड हॉस्पिटलला भरारी पथकांच्या नियमित भेटी होतील, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

xWashim RT PCR Lab Inauguration 10.10

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाकडे आपण लक्ष केंद्रित केले. विकासप्रक्रियेत लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा यांना सोबत घेतले. याचप्रकारे कोविड नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणांना सोबत घेवून काम नियोजनबद्ध काम सुरु आहे. यापूर्वी जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी अकोला, अमरावती, यवतमाळसह इतर जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात येत होते. त्याचा अहवाल येण्यास बराच कालावधी लागायचा. आता जिल्ह्यातच ही प्रयोगशाळा सुरु होत असल्यामुळे २४ तासांच्या आत अहवाल प्राप्त होणार आहेत. २७० नमुने एकाच दिवसांत तपासले जाणार आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदरी’ या मोहिमेचे पहिल्या टप्प्यातील गृहभेटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी १३ कोविड केअर सेंटर, ४ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व २ डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत विषाणू संशोधन व निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाळेसाठी २ कोटी रुपये, औषधे खरेदीसाठी ३ कोटी ६० लक्ष रुपये, ऑक्सिजन सुविधेसाठी ४६ लक्ष रुपये, रॅपिड अँटीजेन टेस्ट कीटसाठी ९९ लक्ष रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले. ते म्हणाले, वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून विषाणू चाचणी प्रयोगशाळेमुळे कोविड साथीनंतरही विविध विषाणूजन्य आजारांच्या निदानासाठी मदत होणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रयोगशाळेमुळे कोरोना चाचण्यांना गती देण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर जिल्हाधिकारी शरद पाटील यांनी केले, आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.