आठवडा विशेष टीम―
जांब येथील तरूण बंडू यशवंत मरकाम हा मागील काही दिवसांपासून आजारी होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या सर्वेक्षणादरम्यान आशा स्वयंसेविका यांनी गृह भेटीत तपासणी केली असता सदर तरूणाचा एसपीओटू 35 टक्के इतका आढळला त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या ठिकाणी सुद्धा सदर व्यक्तीचा एसपीओटू कमी आढळल्याने त्यास भंडारा येथे संदर्भीत करण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी सदर तरूणाचा मृतदेह कोविड केअर सेंटर परिसरात आढळून आला.
या तरूणाच्या कुटुंबियांची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांत्वनपर भेट घेतली असता कुटुंबियांनी आरोग्य यंत्रणेबाबत तक्रार केली. हा विषय विधानसभा अध्यक्षांनी गांभिर्याने घेवून या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. दोषी असणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये, असा प्रश्नही त्यांनी आरोग्य यंत्रणेला विचारला. जिल्ह्यात या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.