भंडारा जिल्हा कोविडमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

भंडारा दि. 10 : कोराना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असून लक्षणं असोत किंवा नसोत प्रत्येक नागरिकांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. गावागावात मोठ्या प्रमाणात तपासण्या करून घेण्यासाठी सरपंच यांनी पुढाकार घ्यावा. आजार अंगावर न काढता काळजी घेतल्यास कोरोनाला आपण हरवू शकतो. लोकांचे जीव वाचवण्यासोबतच जिल्हा कोविडमुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत त्यांनी आज जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ.माधुरी माथूरकर व दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध गावातील सरपंच या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मोठ्या प्रमाणात चाचण्या होणं आवश्यक आहे. गावागावात जागृती आवश्यक असून सरपंच यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आजार अंगावर काढू नका, तपासणीला घाबरू नका, लक्षण आढळताच तपासणी करून घ्या, असे ते म्हणाले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम अत्यंत उपयुक्त असून या मोहिमेत आपल्याकडे येणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे. तपासणी केली तर आजारातून लवकर मुक्तता मिळू शकते. लक्षणं असूनही तपासणीला उशीर केला तर मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी तपासणी करावी, यासाठी तुम्ही पुढाकार घ्या असे आवाहन त्यांनी केले.

ताप, खोकला, घसा खवखव करणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण आढळताच तपासणी करून घ्यावी. चाचण्याची व्यवस्था आरोग्य विभाग मोफत करणार आहे. आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा लवकरच भंडारा येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्याला जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करायचा असून यासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी पुढाकार घ्यावा व यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विनोद कठाणे, अनिता गिर्हेपुंजे, वैशाली रामटेके, चंद्रशेखर थोटे, चंदू बडवाईक, हेमराज पटले, पूजा ठवकर व रवी खजुरे यांच्याशी नाना पटोले यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. ग्रामीण भागातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सरपंचांनी महत्वपूर्ण सुचना केल्या. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला पाठविण्यात आला असून कोविड उपाययोजना या लेखा शिर्षाअंतर्गत कोरोना संबंधिचा खर्च ग्रामपंचायतींनी करावा, अशा सुचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझोडे यांनी सरपंचांना केल्या.

धन्यवाद आशाताई

कोविड काळात उत्तमरित्या आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या स्वयंसेविका आशाताईंना यावेळी थँक यू आशाताई प्रमाणपत्र देऊन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

0000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.