आठवडा विशेष टीम― चंद्रपूर, दि. १२ ऑक्टोबर : खरकाडा ते आरमोरी मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन युवकांचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. या युवकांच्या घरी भेट देऊन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
खरकाडा गावातील प्रशांत सहारे व रोहित चट्टे हे मित्र रोज सकाळी साडेचार वाजता खरकाडा -आरमोरी रस्त्यावर व्यायाम आणि मॉर्निंग वॉकला जात होते. 9 ऑक्टोबरला सुद्धा ते सकाळी व्यायाम करण्यासाठी गेले असता एका ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तरुण मुलांच्या अशा अपघाती निधनाने कुटुंबियांवर शोककळा पसरली. पालकमंत्र्यानी आज त्यांच्या ब्रह्मपुरी दौऱ्यादरम्यान या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्र्यांना विनंती करून मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबियांना 2 लाख रुपये सानुग्रह मदत देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.