कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून आढावा

आठवडा विशेष टीम― अमरावती, दि. १२ : कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत रोडावली असली तरी साथ अजूनही संपलेली नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतील लिक्वीड ऑक्सिजन टँक व इतर नियोजित कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह क्र. १ येथे झाली. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोनाबाधित, उपचार स्थिती, उपलब्ध यंत्रणा, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम, दंडात्मक कार्यवाही आदी विविध बाबींचा आढावा घेतला. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत काही प्रमाणात घट जाणवत असली तरीही जोखीम संपलेली नाही. त्यामुळे नियोजित कामे विहित वेळेत पूर्णत्वास न्यावीत. आरोग्य प्रशासनातील अधिका-यांनी उपचार व इतर बाबींसाठी लागणा-या साधनसामग्रीबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला पाहिजे. जिल्ह्यात व ग्रामीण भागातही वेळोवेळी भेट देऊन तेथील यंत्रणेच्या कामाची तपासणी करावी.

108 रूग्णवाहिका सेवेबाबत अनेक ठिकाणाहून तक्रारी येत असतात. त्याबाबत संबंधित यंत्रणेशी करण्यात आलेला करार, अटी-शर्ती तपासल्या पाहिजेत. या सेवेत तत्काळ सुधारणा होणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित प्रशासनाने अशा सेवांबाबत वेळोवेळी तपासणी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व ऑक्सिजन व ऑक्सिजन वाहतूक आदींच्या दरनियंत्रणाबाबत माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.