कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही, गांभीर्याने घ्या!- पालकमंत्री अब्दुल सत्तार

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

धुळे, दि. 12 (वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला, तरी त्याचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये. नागरिकांनी कोरोना विषाणूला गांभीर्याने घेत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

पालकमंत्री श्री. सत्तार दोन दिवसांपासून धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज दुपारी धुळे व साक्री तालुक्याचा पाहणी दौरा केला. त्यानंतर सायंकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे तालुक्यातील ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’, महाराजस्व अभियान, सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मंगलाताई पाटील, महिला व बालविकास विभागाच्या सभापती धरती देवरे, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, महानगरपालिका स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचे किट वितरण, कोरोना कालावधीत उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल आशा स्वयंसेविकांचा सत्कार, महाराजस्व अभियानातंर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आढळून येणाऱ्या को- मॉर्बिड रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. घरातील वयोवृध्दांची काळजी घ्यावी. मास्कचा नियमितपणे वापर करावा. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल सादर करावा. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे राहिले असतील त्यांचेही पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूला रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. ते दैनंदिन संपर्कात राहून आढावा घेत होते. कोरोना विषाणूचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे. तालुका आरोग्य अधिकारी तरन्नूम पटेल, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे यांनी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेची माहिती दिली. प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री. चौधरी यांनी शेतीच्या पंचनाम्यांची माहिती दिली. तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी महाराजस्व अभियानाची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेची सभापती श्री. खलाणे, सदस्य राम भदाणे, संग्राम पाटील, आशुतोष पाटील यांनी विविध सूचना केल्या. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.