सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका प्रत्येक विभागाने बजवावी

आठवडा विशेष टीम―

धुळे, दि. 11 : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या कालावधीत धुळे जिल्ह्यातील सर्व विभागांनी चांगली कामगिरी बजावल्याने कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. या पुढे सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना न्याय देण्याची भूमिका बजवावी, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

पालकमंत्री श्री. सत्तार दोन दिवसांपासून धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँकचे काम तातडीने पूर्ण करावे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध झालेले डायलिसिस मशीन तत्काळ सुरू करावेत. मर्चंट बँकेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची सहकार व पोलिस विभागाने पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करीत सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा. आदिवासी विकास विभागाने अमृत आहार योजनेंतर्गत दिला जाणारा आहार सकस राहील, अशी दक्षता घ्यावी. तसेच वसतिगृह, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. कृषी विभागाने सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावेत. वीज वितरण कंपनीने जोडण्या तातडीने जोडाव्यात. या विभागाच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी सादर करावी. याबाबत ऊर्जा मंत्री यांच्याकडे स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात येईल.

यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी वाहून जात आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पाण्याचा थेंबन अन् थेंब अडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आवश्यक तेथे गेट टाकावेत. कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांनाही गेट बसावावे. जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. महानगरपालिकेने महिलांसाठी स्वतंत्र दवाखाना कार्यरत करावा. महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा. ग्रामपंचायत कार्यालयांसाठी आवश्यक निधीच्या उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करावा, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग यंत्रणेचे ई- लोकार्पण

जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या स्कॅनिंग यंत्रणेचे ई- लोकार्पण पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते आज सायंकाळी झाले. नवीन नियोजन भवनात हा कार्यक्रम झाला. महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मंगलाताई पाटील, महिला व बालविकास विभागाच्या सभापती धरती देवरे, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, महानगरपालिका स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे आदी उपस्थित होते.

या यंत्रणेमुळे दुर्धर आजारांचे निदान तातडीने करणे शक्य होईल. यामुळे गरजू सामान्य रुग्णांना कमी खर्चात सुविधा उपलब्ध होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय मशीन कार्यान्वित करण्यासाठी 8 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून देवू. त्यामुळे धुळेकरांना लवकरच एमआरआय सुविधा उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. तसेच नियोजन भवनातील पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.