आठवडा विशेष टीम―चंद्रपूर, दि. १२ ऑक्टोबर : ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. यात अभ्यासिका, स्विमिंग पूल, गार्डन, क्रीडा संकुल तसेच ब्रह्मपुरी, सावली, आणि सिंदेवाही तालुक्यातील गोसेखुर्दच्या धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत.
ब्रम्हपुरी येथे अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज अनेक प्रलंबित विषय मार्गी लावलेत. यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा होता. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कालव्यांची आणि बंद नलिकेची कामे हंगाम संपताच त्वरित सुरू करून लवकरात लवकर संपवण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. त्याचबरोबर मेंढकी सहित 24 गावात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
ब्रह्मपुरी नगर परिषद क्षेत्रामध्ये गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. यासाठी मंजूर असलेल्या अभ्यासिकेचे काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. सोबतच नगरपरिषद अंतर्गत स्विमिंग पुल, गार्डन आणि खेळाडूसाठी तालुकास्तरीय क्रीडा संकुल मंजूर आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे कामे सुरू झाली नाहीत. या सर्व कामांची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी तातडीने घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व कामे सुरू करावी , असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.कुचनवार, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.मुश्ताक, गोसेखुर्द धरण कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सातपुते, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.नैताम, ब्रम्हपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर, तहसीलदार विजय पवार उपस्थित होते.