शंभर फूट ध्वजस्तंभ व शंकुतला रेल्वे इंजिनचे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण

आठवडा विशेष टीम―

अकोला, दि. १८ – अकोला रेल्वेस्थानकावर मागील काही दिवसापासून सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत शंकुतला रेल्वे इंजिनची स्थापना, सुमारे शंभर फुट ध्वजास्तंभ व अठरा बल्ब असलेल्या फ्लड लाईट कामाचे लोकार्पण केन्द्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर अर्चनाताई मसने, आमदार रणधिर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, भुसावल रेल्वे विभागाचे विभागीय मंडल अधिकारी विवेक गुप्त यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संजय धोत्रे म्हणाले, केंद्र सरकार सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून अकोला रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच 750 कोटी रुपये प्रस्तावित असून यामुळे नागरिकांना सर्वसामान्य सुविधा सोबत रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोला रेल्वे स्टेशन सौंदर्यिकरण करण्याचे काम जोमाने सुरु असून 1911 च्या शकुंतला इंजन रेल्वे स्टेशनच्या दर्शनीभागात स्थापित करण्यात आले आहे. तसेच विदर्भात सर्वात मोठा सुमारे शंभर फुटाचा राष्ट्रीयध्वज उभारण्यात आला आहे. तसेच सदर परिसर एलईडी लाईटने सुशोभित करण्यात आला आहे. अकोला रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना सुविधासाठी तिसरा रेल्वे दादरा निर्माण करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. प्लॅटफॉर्म नंबर एक, दोन व तीन येथे प्रवासासाठी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच रेल्वेस्टेशन सौंदर्यिकरण करण्यासाठी 720 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर अकोला शहरातील रेल्वे स्थानक हे सर्व सुविधायुक्त होणार असल्याचेही माहिती रेल्वे विभागाचे अधिकारी इनामदार यांनी दिली.

केन्द्र शासन जनतेच्या सुविधेसाठी कार्यरत असून नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या दिशेने काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अकोला रेल्वेस्थानक हे मध्यस्थानी असल्यामुळे अकोलासह अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील प्रवास सुविधा तसेच आदिवासी क्षेत्र व शेतकऱ्यांना मालवाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध झाली असल्याचे श्री. धोत्रे यांनी सांगितले.

यावेळी विजय अग्रवाल, तेजराव थोरात, राजेंद्र गिरी, ॲड. सुभाष सिंग ठाकूर, ज्ञान प्रकाश खंडेलवाल, वसंत बाछुका आदींसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.