आठवडा विशेष टीम―
कोल्हापूर, दि. 18 : अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राचे पंचनामे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. याबाबतचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. शेतकऱ्यांनीही गट विकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन कोवाड येथे बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील शेत पिकांचे नुकसान, सुरु असणारे पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, जिल्ह्यामध्ये सुरु असणारे पंचनामे 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा. पंचनाम्यामधून कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता ग्रामसेवक आणि तलाठी यांनी घ्यावी. त्याबाबत त्यांची जबाबदारी राहील, तसे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत. पंचनाम्यासाठी ज्या गावात जाणार आहेत, त्याबाबत ग्रामस्थांना अदल्यादिवशी त्याबाबत गावांमध्ये दवंडी देवून कळवावे. पंचनामा करण्यात येणार असल्याबाबतचा संदेशही एक दिवस आधी पाठवावा. शेतकऱ्यांनी पंचनाम्याबाबत. तहसिलदार, गट विकास अधिकारी यांना संपर्क करुन सहकार्य करावे. राज्य शासन तत्परतेने गांभीर्यपूर्वक भरपाई देण्यासाठी पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल.
वादळीवारे, अतिवृष्टीमुळे शेतात पडलेला ऊस गाळपाला आधी गेला पाहिजे त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही पाठवावे, असेही पालकमंत्री म्हणाले.
दुंडगे, कुदनूर पुलाबाबत लवकरच बैठक
दुंडगे, कुदनूर गावांना जोडणाऱ्या पुलाची पाहणीही पालकमंत्र्यांनी आज केली. या पुलाला संरक्षित कठडा नसल्याने हा पूल धोकादायक होत आहे. या पुलावरुन व्यक्ती वाहून जाण्याच्या घडलेल्या घटनेची माहिती आमदार श्री. पाटील आणि ग्रामस्थांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. या पुलाबाबत लवकरच बैठक घेवून, हा पूल ग्रामस्थांसाठी सुरक्षित केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन, अरुण सुतार, गडहिंग्लजचे पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, दुंडगेचे सरपंच राजेंद्र पाटील, तहसिलदार विनोद रणावरे, गट विकास अधिकारी चंद्रकांत बोदरे , उप विभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम आदींसह या परिसरातील अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.