खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालवा दुरूस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे

आठवडा विशेष टीम―

बुलडाणा, दि. १८ : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी देऊळगाव धनगर, वसंत नगर परीसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. पीके पाण्यात गेली. तरी या कालव्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव संबंधीत विभागाने तातडीने सादर करावा व कालवा दुरूस्त करावा, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.

चिखली येथील विश्राम गृह येथे खडकपूर्णा प्रकल्पाबाबत निगडीत असलेल्या विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन 17 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, पांडुरंग, पुनर्वसन अधिकारी श्री. माचेवाड, खडकपूर्णा प्रकल्पाचे अभियंता वैभव आव्हाड, संदीप कंकाळ, सहायक अभियंता राजेश मुरमुरे, एकनाथ थुट्टे, शेनफड घुबे, विकास मिसाळ, गजानन पवार, प्रकाश गिते, गणेश भुतेकर, सुरेश भुतेकर, विष्णू बनकर आदी उपस्थित होते.

कालव्याच्या अर्धवट कामामुळे पाणी शेतात गेल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्ययांना पुढील 15 दिवसांत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची कार्यवाही तातडीने करावी. शेतकरी आपला केंद्रबिंदू असून रात्रंदिवस त्याच्या कल्याणासाठी काम करून त्यांना दिलासा द्यावा. जास्तीत जास्त पाणी वापर संस्था सथापन करून त्यांची कार्यशाळा घ्यावी. कालव्याच्या चाऱ्या मोऱ्यांचे काम पूर्ण करावे. प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ शेवटच्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. शासनाने करोडे रूपये खर्च करून प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना लाभ द्यावा. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करता कामा नये. सिनगांव जहागीर येथील पुनर्वसनाचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावावा. प्रकल्पग्रस्त नागरीकांना दिलासा द्यावा. अशा सूचनाही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी दिल्या.

ते पुढे म्हणाले, चाऱ्या मोऱ्यांचे काम अपूर्ण असल्याने पाणी असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या चाऱ्या मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्रकल्प 100 टक्के भरला आहे. या पाण्याचा लाभ घेवून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्याची संधी द्यावी. यावेळी संबंधीत विभागाचे कर्मचारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.