कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आणि रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी सुरु करावी

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २१ : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तसेच रोजगारसंधी विस्तारल्या जाव्यात यादृष्टीने संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी मर्यादित, दर्यापूर जिल्हा अमरावती सुरु व्हावी यासाठी सहकार विभाग, वस्त्रोद्योग विभाग आणि राज्य सहकारी बँक यांनी एकत्रितरित्या पावले उचलावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

विधान भवन येथे आज संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी मर्यादित, दर्यापूर सुरू करण्याच्या दृष्टीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार बळवंत वानखेडे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, वस्त्रोद्योगाचे प्रधान सचिव पराग जैन आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ही सूतगिरणी पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असून त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे तरूणांना रोजगार संधीही प्राप्त होईल. त्यादृष्टीने या तिन्ही घटकांची भूमिका महत्त्वाची असून, त्यासंदर्भात एक महिन्याच्या आत तातडीने कार्यवाही व्हावी. संबंधित विभागांच्या मंत्री महोदयांनी यासंदर्भात बैठक घेऊन पुढील कार्यवाही करावी अशा सूचनाही श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.