आठवडा विशेष टीम―
अत्यावश्यक सेवा वगळता इतर क्षेत्राकरिता लोकल सेवा सुरू करण्याबाबत विविध व्यावसायिक संघटना व प्रवासी संघटना आणि मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. वडेट्टीवार बोलत होते.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, सध्या फक्त अत्यावश्यक सेवा वगळता महिलांसाठी सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सातनंतर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, घरेलू कामगार तसेच अन्य लोकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन हाच पर्याय आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत सध्या विविध क्षेत्रांतील लोकांशी चर्चा करून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याबाबतही शासनाचे प्रयत्न सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे आवश्यक आहे. परंतु कोरोनाचा प्रसार रोखणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे याबाबी ही महत्त्वाच्या आहेत. जितकी अर्थव्यवस्था महत्त्वाची तितकेच लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही श्री. वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अभय यावलकर, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध व्यावसायिक संघटना व प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.