नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करण्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

आठवडा विशेष टीम―

बुलडाणा, दि.22 : नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने दे. राजा तालुक्यातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. पीके पाण्यात गेली असून शेतकरी संकटात सापडला आहे. या बळीराजाच्या मदतीसाठी पिकांचे पंचनामे सरसकट पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.

दे. राजा येथील विश्राम गृह येथे तालुक्यातील अती पावसामुळे झालेले नुकसान व रस्ते दुरूस्तीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रविकांत काळवाघे, पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

तालुक्यात पावसामुळे सर्वच पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देत पालकमंत्री डॉ.शिंगणे म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची कार्यवाही तातडीने करावी. शेतकरी आपला केंद्रबिंदू असून रात्रंदिवस त्याच्या कल्याणासाठी काम करून त्यांना दिलासा द्यावा. नुकसान भरपाई 100 टक्के देण्यासाठी पुन्हा पंचनामे करावे. पावसामुळे रस्तेदेखील खराब झाले असून ज्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे, ते रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावेत. रस्त्यांची कामे करताना दर्जेदार करावीत.

यावर्षी कोरोना संसर्गामुळे निधीची करतरता आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून कामे पूर्ण करावीत. कामे करताना प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करावीत. कृषी व महसूल यंत्रणांनी सक्रियतेने शेत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत. बळीराजाला तातडीने आर्थिक मदत देण्याची कार्यवाही करावी, असेही डॉ.शिंगणे यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.