आठवडा विशेष टीम―
अमरावती जिल्ह्यातील खरेदी विक्री संस्थांच्या प्रलंबित थकबाकीबाबत पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पाच ऑक्टोबरला अमरावती येथे बैठक झाली होती. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळच्या चर्चेत ठरल्यानुसार याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दालनात आज बैठक आयोजित करण्यात आली. त्यानुसार खरेदी विक्री संघाचे कमिशन व हमाल बांधवांचा मोबदला आठ दिवसात अदा करण्याचे निर्देश श्री. पटोले यांनी दिले आहेत.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीला पालकमंत्री ॲड. ठाकूर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार बळवंतराव वानखेडे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, पणन विभागाचे अवर सचिव सुनंदा घड्याळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, आदींसह नाफेड, मार्केटींग फेडरेशन, पणन महासंघाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेत सहभाग घेतला.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या प्रक्रियेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना धान्याच्या मालाचा परतावा वेळेवर न मिळाल्यास पुढील वर्षी पीक उत्पादनास त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गोदामात माल गेल्यावर चलन पावती मिळाल्यानंतर पैसे देण्याच्या प्रक्रियेस विलंब होतो आणि यामुळे शेतकऱ्यांचे एकप्रकारे शोषण होत असल्याचे दिसून येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या खरेदी-विक्री व परतावा या प्रक्रियेस गती मिळणे अत्यावश्यक असून, दरवर्षीचे जे कमिशन देय आहे, त्याप्रमाणे आजतागायतचे शेतकऱ्यांची देय रक्कम आणि हमालाचे मोबदला आणि यंदाच्या वर्षीची तफावत तातडीने आठ दिवसात अदा करण्यात यावे. तसेच यावर्षीच्या हंगामात तात्काळ सर्व खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे असेही नाना पटोले म्हणाले.
खाजगी संस्थांना प्राधान्य देऊन सहकारी संस्थांसाठी अडचणी निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना संरक्षण देणे अत्यावश्यक असल्याने भविष्यात सहकारी संस्थांच्यावतीने यापुढे खरेदी-विक्री करण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचनाही अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्या आहेत.
०००