एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा-राऊत

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २७ : एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा; ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

 

खानापूर (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार अनिल बाबर, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, ओव्हरलोडिंगमुळे रोहित्रे नादुरुस्त होण्याच्या समस्या दूर करण्यासाठी ओव्हरलोड झालेल्या रोहित्राशेजारी नवीन रोहित्र उभारण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील नवीन वीजजोडणीची प्रकरणे (पेड पेंडिंग) मार्गी लावण्यासाठी स्वखर्चाने तसेच डीपीडीसीच्या निधीतून रोहित्रे उभारणी करू इच्छिणाऱ्यांना रोहित्रे उभारून देण्यात येतात. तथापि, याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात वीजजोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत; ते प्रस्तावित कृषी पंप वीज जोडणी धोरणात मार्गी लागतील. त्याचबरोबर महावितरणमधील ३ हजार ५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, तथापि, मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात  सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबावे लागले असून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशीही माहिती डॉ.राऊत यांनी दिली.

 

खानापूर मतदारसंघात नवीन उपकेंद्र उभारणीचे प्रस्ताव मार्गी लावावेत, 4.5 मेगावॅट सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी जागेच्या उपलब्धतेचे काम बहुतांश मार्गी लावले आहेत तरी या कामांच्या प्रस्तावाला गती द्यावी, तसेच ३३ केव्ही इएचव्ही सबस्टेशनमधून बे देण्यात यावेत आदी मागण्या आमदार अनिल बाबर यांनी यावेळी मागण्या केल्या, त्यावर डॉ.राऊत यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.