आठवडा विशेष टीम―
गेल्या काही महिन्यांत या आरटी-१ वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ पिंजरा तोडून पळाला होता, पण पुन्हा आज त्याला सापळा लावून पकडण्यात आले.
हा वाघ सुमारे वीस चौरस किलोमीटर परिसरात फिरत होता. त्याला पकडण्यासाठी मुख्य वन्यजीव रक्षक यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश दिलेले होते. तेंव्हापासून वन विभागाची पथके या वाघाच्या मागावर होती. पण तो हुलकावण्या देत होता. रात्रीच्या अंधारातच त्याचा अधिक वावर होता. या वाघाला जिवंत पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २५ वनरक्षकांची चार पथके (STPF), १४ गावांतील ३५ स्वयंसेवक यांच्यासह ४ पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी प्रयत्न करत होते. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरेही लावण्यात आले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ सापळ्यात अडकता-अडकता पिंजरा तोडून पळाला होता.
मागावर असलेल्या पथकांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले. यात चांदा वन विभागातील राजूरा व विरुर वनपरिक्षेत्रात सिंदी गावाजवळ रेल्वेच्या पुलाखाली लावलेल्या सापळ्यात हा वाघ अडकला. या वाघाला पशूवैद्यकीय पथकाच्या मदतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या वाघास जिवंत जेरबंद करण्यात आल्याने हे वन विभागाचे मोठे यश मानले जात आहे. या प्रय़त्नांसाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वाघाला जिवंत जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. वाघ जेरबंद झाल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.