आठवडा विशेष टीम―
लातूर जिल्ह्यातील पुरातत्व विभागातील विविध प्रश्नांबाबतची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस राज्य पुरातत्व आणि संग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे, पुरातत्व वास्तुशास्त्रज्ञ तेजस्विनी अफाळे आणि राज्य पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्याचा इतिहास जगासमोर आणत असताना येथील स्थानिक पर्यटन आणि रोजगार उपलब्धीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यामध्ये लातूर जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध बनविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीडिसी) च्या माध्यमातून काही योजना सुरू करण्यात येणे गरजेचे आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट सांस्कृतिक विकासासाठी नियमावली किंवा मार्गदर्शन तत्त्वे तयार करणे हे असून लातूरच्या अंतिम क्षेत्रीय योजनेतील ठळक उद्दिष्टांपैकी एक असणार आहे, असेही श्री.देशमुख म्हणाले.
श्री.देशमुख म्हणाले, येथील ऐतिहासिक प्रदेश आजवर पर्यटनदृष्ट्या मागे राहिला आहे. त्यामुळेच राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाने लातूरसाठी सुनियोजित आराखडा बनवावा. तसेच संभाव्य आराखड्यामध्ये लातूर जिल्ह्यातील नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा स्थळांचे सुयोग्य नोंदणीकरण करणे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे-भाग सुनिश्चित करणे, तेथील सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्याच्या संवर्धनासाठी प्रकल्पाची मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे या बाबींचा आराखड्यामध्ये समावेश करावा. तसेच, स्थानिकांमध्ये आपल्या सांस्कृतिक वारसासंदर्भात जागृती निर्माण करणे, येथील सांस्कृतिक विकास आणि पर्यटन व्यवसायास चालना, स्थानिकांना रोजगार निर्मिती याबाबतही उपाययोजना या विकास आराखड्यात करण्यात याव्यात.
एस. टी महामंडळाचा सहभागातून शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लातूर जिल्ह्यात सहली आयोजित कराव्यात व त्यांना लातूरमधील समृद्ध वारशाची माहिती देण्यात यावी. त्याचबरोबर विविध विद्यापीठाच्या सहभागाने अभ्यास सहल, वारसा स्थळांचे दौरे आयोजित करता येऊ शकतात. लातूर जिल्ह्यात अनेक राजकीय व्यक्ती, शाहीर, कवी, साहित्यिक आदी कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म झाला. या महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करुन त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी त्यांचे जन्म गाव, त्यांची कर्मभूमी हे वारसा स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या.
सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित पर्यटन विकास आराखड्यामध्ये लातूर जिल्ह्यातील सांस्कृतिक, नैसर्गिक व त्या अनुषंगाने असणाऱ्या अमूर्त वारसा ठेव्याचे सुनियोजित नोंदणीकरण करून या बाबतीतील दस्तऐवज तयार करणे, त्याच्या संवर्धन व पर्यटनसंबंधित प्रकल्पासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
00000