आठवडा विशेष टीम―
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, पोलीस अधिक्षक वसंत जाधव, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, यावेळी उपस्थित होते.
तालुका पातळीवर असलेल्या कोविड केअर सेंटरमधील सुविधा व खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला. सीसीसी सेंटरमध्ये दर्जेदार भोजनाची सुविधा देण्यात यावी, असे निर्देश यावेळी अध्यक्षांनी दिले. कोरोनामुक्त जिल्हा करायचा असल्यास प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. सेंटरमध्ये व्यवस्था पूर्ण असावी अशी लोकांची व रुग्णांची अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. सीसीसी सेंटरमध्ये लोकांना भरती व्हावे असे वाटावे अशी व्यवस्था उभारण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. याबाबत तक्रारी येता कामा नये, याची खबरदारी घेण्यात यावी. सेंटरचे प्रभारी अधिकारी कोण आहेत त्यांचे नाव व नंबर प्रसारित करण्यात यावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
जिल्ह्यात भंडारा तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे ही बाब पाहता याठिकाणी विशेष तपासणी अभियान राबविण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. संपर्क शोध मध्ये सुधारणा झाली असून पूर्वी 7.30 टक्के होते आता ते सरासरी 11.66 टक्क्यांवर गेला आहे. सध्या 883 क्रियाशील रुग्ण आहेत तर बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने 16 अँबुलन्स आरोग्य विभागाला उपलब्ध झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गावातच चाचणी शिबिर घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. गरोदर महिलांची प्रसूती शासकीय रुग्णालयातच झाली पाहिजे त्यांना रेफर करण्यात येऊ नये असे सक्त निर्देश देण्यात आले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिमेत पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण केला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी दिली.
79 धान खरेदी केंद्राना मंजुरी देण्यात आली असून 53 केंद्र सुरू झाली आहेत अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी दिली. 7 केंद्र वगळता सर्व केंद्रावर बारदाना पोहोचलेला आहे. नवीन धान खरेदी केंद्रासाठी शासनाने अनामत रक्कम १० लाख ठेवली आहे, संस्थेकडे 500 मेट्रिक टणाचे गोदाम असायला हवे, एक वर्षांचा ऑडिट अहवाल असावा, असे निकष असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पवनी आणि लाखांदूरची धान खरेदी तात्काळ सुरू करावी असे निर्देश पटोले यांनी यावेळी दिले. धान खरेदी होताच तात्काळ प्रक्रिया व्हावी या संदर्भात मुंबईत बैठक लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सर्वच्या सर्व केंद्र तात्काळ सुरू करावे असेही त्यांनी सांगितले.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात 41 हजाराचे वर शेतकऱ्यांचे 20 कोटी 11 लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज असून मदतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे कृषी विभागाने सांगितले. तुडतुड्याचा सर्व्हे सुरू असून सर्व्हे होताच मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. रब्बीचे 12790 हेक्टरचे नियोजन केले आहे. खत उपलब्ध आहेत. मका क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभाग नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. गहू, चना आणि मकाचे व्यवस्थित नियोजन करावे व केंद्र सुरू करावे, अशा सूचना विभागाला देण्यात आल्या.
जिल्हा नियोजन मार्फत मिळणाऱ्या निधीच्या खर्चाचे नियोजन करावे. काम गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रशासनाने विकास कामे गांभीर्याने करावी. सामान्य माणसाची सेवा व जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प हे धेय्य ठेवा असे डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून यांनी आभार मानले.