शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी कृषि विभागाने विशेष प्रयत्न करावेत – पालकमंत्री

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

जळगाव दि. 2 – शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा याकरिता राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषि विभागाने विशेष प्रयत्न करावेत. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

जिल्ह्यातील कृषि व पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, आत्माचे मधुकर चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र ममुराबादचे हेमंत बाहेती, पालचे महेश महाजन यांच्यासह कृषि व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले , यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. याकरिता येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पिकांचे बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. पोकरा योजनेतंर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या शेतीशाळांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व तरुण शेतकऱ्यांचा समावेश करावा. जिल्ह्यात शेतीपूरक उद्योग म्हणून दुग्धव्यवसाय वाढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

पशुवैद्यकीय महाविद्यालय जागा हस्तांतरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करा

शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळता यावे, याबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांना जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे याकरिता सावखेडा येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरु करण्याकरिता आवश्यक असलेली जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत जिल्ह्यात भरताची वांगी, खपली गहू, केळीपासून पूरक उद्योग सुरु करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना, पोकरा व स्मार्ट योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व उत्पादक कंपन्याना लाभ मिळवून द्यावा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

डिसेंबरमध्ये जिल्ह्यात होणार भरीत महोत्सव

जळगावच्या भरीताच्या वांग्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. भरीताच्या वांग्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्याचा अधिकाधिक प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात भरीत महोत्सवाचे आयोजन करावे, तसेच नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून भरीत भाकरीचा स्टॉल लावण्याची सूचना कृषि विभागास दिली. त्यानुसार हा महोत्सव घेण्यात येईल अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी बैठकीत दिली.

बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘विकेल ते पिकेल’ या योजनेतंर्गत भरीताचे वांगे, केळीपासून बनविलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉलचे उद्धाटन करण्यात आले.

अनोरे ग्रामस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

अनोरे, ता. अमळनेर या गावास जलक्रांती अभियानात राष्ट्रीय स्तरावरचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते संदिप पाटील व इतर ग्रामस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कृषि उपसंचालक अनिल भोकरे, कृषि सहायक किरण वायसे व नरेंद्र पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 68 हजार 423 शेतकऱ्यांच्या 36 हजार 360 हेक्टरवरील पिकांचे 26 कोटी 72 लाख 41 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवर हरभरा तर 80 हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड होईल. विकेल ते पिकेल योजनेतंर्गत जिल्ह्यात 38 प्रकल्पांचे उद्दिष्ट असून सध्या 19 प्रकल्प सुरु आहेत. पोकरा अतंर्गत जिलह्यात 460 गावे समाविष्ट असून त्याअतंर्गत 86 कंपन्या कार्यरत आहे असून आतापर्यंत 44 कोटी 40 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यातील 8934 शेतकऱ्यांनी केळी पीक विमासाठी नोंदणी केल्याची माहिती श्री. ठाकूर यांनी प्रास्ताविकात दिली.

रब्बी हंगामासाठी बीयाणे व खतांची अडचण येणार नाही अशी माहिती मधुकर चौधरी यांनी दिली. सद्य:परिस्थितीमध्ये जिल्ह्यात 8 लाख 53 हजार पशुधन आहे. सध्याच्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात शेळ्या व मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर गाई व म्हशींची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत 1.5 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून जिल्ह्यात देशी गोवंश संवर्धन मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त डॉ. पाटील यांनी बैठकीत दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कृषि व कृषि क्षेत्राशी निगडीत विविध योजनांचा आढावा घेतला. उपस्थितांचे आभार संजय पाटील यांनी मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.