आठवडा विशेष टीम―
नागपूर, दि. 2: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही जागृती मोहीम अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 5 लाख 18 हजार 329 घरांपैकी 5 लाख 9 हजार 121 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. 27 ऑक्टोबरपर्यंत 21 लाख 88 हजार 804 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 हजारांवर उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आले. लॉकडाऊननंतरच्या काळात उच्चरक्तदाब अर्थात बीपीच्या रुग्ण संखेत अधिक वाढ झाली आहे.
प्रशासनाने नेमून दिलेल्या 1994 पथकाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला, सारी तसेच मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंड रोग, यकृत आजार तसेच इतर आजाराने ग्रस्त नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेंतर्गत नागपूरसह कामठी, हिंगणा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड, भिवापूर तसेच कुही या तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये या आजारांसह जोखमीचे आजार असल्यास उपचार तसेच त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये 1 हजार 98 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सारी आजाराचे 1 हजार 412, मधुमेहाचे 27 हजार 498, उच्चरक्तदाबाचे 4 हजार 10, मूत्रपिंड आजाराचे 972 तर यकृताचे 486 रुग्ण आढळून आले. इतर आजाराने ग्रस्त असे जोखमीचे 44 हजार 713 रुग्ण आढळून आले. असे विविध आजाराचे तब्बल 77 हजार 679 रुग्ण आढळून आले.
सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी प्रशासनाला उत्तम सहकार्य केले असून यामुळे कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी निश्चितच मदत होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.