एसटीच्या ‘नाथजल’ शुद्धपेयजल योजनेचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २ : एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने ‘नाथजल’ शुद्ध पेयजल योजनेचे उद्घाटन परिवहन मंत्री व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या हस्ते आज करण्यात आले.

श्री. परब म्हणाले, या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते त्यांच्या आदराप्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ हे नाव देण्यात आले आहे. टप्याटप्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर ‘नाथजल’ हे एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये दर्जेदार शुद्ध पेयजल एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही श्री. परब यांनी सांगितले.

संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरविण्यासाठी मे. शेळके बेव्हरेजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेची निवड करण्यात आली असून, सर्व बस स्थानकावर 650 मिलीमीटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे ‘नाथजल’ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका असेल, अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, मे.शेळके बेव्हरजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश शेळके व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.