स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न करण्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

नंदुरबार दि.3 : जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, ग्रामीण भागात पाझर तलावाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात यावी. यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. वन विभागाने वनाच्छादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. जंगलातील उत्पादनाच्या माध्यमातूनदेखील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगार मिळू शकेल. आयुर्वेदीक औषधाच्यादृष्टीने उपयुक्त वनस्पतींची लागवड करण्यात यावी. आदिवासी बांधवांना जंगलाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी वनधन केंद्राची स्थापना करावी.

कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यात यावे. नागरिकांना त्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात यावी. स्थलांतराची नोंद ग्रामपंचायतस्तरावर घेण्यात यावी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी रापापूर, उमराणी आणि रामपूर प्रकल्पाबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.