सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ३ : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एलआयसी योजनेंतर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत ॲड.ठाकूर बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, एलआयसी चे अधिकारी उपस्थित होते.

ॲड. ठाकूर म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एलआयसी योजनेतंर्गत एकरकमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरु आहे. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ या वर्षांत ९०० प्रकरणे आली होती. यापैकी ८७५ प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे त्रुटी असणारे आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

एलआयसीमार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची ६५ वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा , सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या सेविकांच्या वारसदारांसही एवढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ७५ हजार रु. रक्कम देण्यात येणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.