आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नका

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 3 : शैक्षणिक क्षेत्रातही डिजिटल युग आले असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मिटिंगद्वारे झाले.

स्पर्धेचा विषय मराठी परंपरा संवर्धनाचा तसेच संस्थेच्या उद्दिष्टांशी पूरक असल्याने राज्य मराठी विकास संस्थेने सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला.

मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नामजोशी यांनी प्रास्ताविक केले. अनिल गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील, प्रशासकीय अधिकारी गिरीश पतके, मराठी काका म्हणून ओळखले जाणारे अनिल गोरे, पराग गाडगीळ, तालयोगी सुरेश तळवलकर, निर्मिती नामजोशी, समीर बापट आदी या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले.

मराठी भाषामंत्री सुभाष देसाई म्हणाले,’गणिताची गोडी वाढविण्याचा अंकनादचा प्रयत्न स्तुत्य आहे. आपल्या जीवनात अंक आणि नाद अपरिहार्य आहे. पूर्वी प्रार्थना, परवचे ,पाढे होत असत. मुलांना ही सवय होती. तेव्हाच्या जीवनात सूर, ताल साथ करीत असत. काकडारती, घंटानाद, जनावरांच्या गळ्यातील घंटाचा नाद हे मुलांचे भावविश्व होते. कवितेचे, गणिताचे नाद आणि तालाची साथ असायची. आता पाढे किती म्हणून घेतले जातात? शैक्षणिक विश्व डिजिटल झाले आहे. आधुनिक तंत्राचे स्वागत करताना पारंपरिक पाढे विसरता कामा नयेत. जुन्या पिढीला निमकी, अडीचकी, पावकी यायची. पाठांतराची परंपरा अभ्यासातून कमी झाली तरी पाठांतराला दुय्यम लेखता कामा नये. हिशेब करताना या पाठांतराचा फायदा व्हायचा. जुनेपणाचा शिक्का मारून पाढे दूर लोटू नका. गणिताचे आकलन, गोडी वाढविण्याचा राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि. चा प्रयत्न स्तुत्य असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ नितीन करमळकर म्हणाले, ‘लयबद्ध माध्यमातून गणित पुढे जाण्याचा प्रयत्न होतो आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. गणित आपल्याला अवघड वाटते. पण गणित योग्य पद्धतीने शिकवले गेले तर त्याचा आयुष्यभर उपयोग होतो. आजच्या जगात अल्गोरिदम लिहायला गणिताचा उपयोग होतो. अनेक विद्यार्थी भीतीपोटी गणितापासून दूर जातात. गणित हा घाबरण्याचा विषय नाही’ असेही डॉ.करमळकर यांनी सांगितले.

मराठी काका म्हणून परिचित असलेले श्री.अनिल गोरे म्हणाले, ‘७० टक्के संभाषणाच्या वाक्यात संख्या, अंक येतात. विद्यार्थी ते विक्रेते या वर्गाला ज्यांना अंकनाद, पाढे पाठ आहेत, त्यांना सेकंदात आकडेमोड करता येते. कागदावर हिशेब आणि गणकयंत्र वापरायची गरज नाही. वेळ वाचवायचा असेल तर अंक, पाढे, पावकी–निमकी–अडीचकी पाढे उपयोगी पडतात, असेही श्री.गोरे यांनी सांगितले.

श्री.मंदार नामजोशी यांनी पाढे स्पर्धेची माहिती दिली. ३० नोव्हेंबरपर्यंत नोदणी करता येणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत पाठांतराचे व्हिडिओ अपलोड करता येतील. १ ते १५ जानेवारी पर्यंत परीक्षण होईल. १५ जानेवारीला जिल्हास्तर निकाल जाहीर केला जाईल. ११ हजार, ७ हजार, ५ हजार अशी पारितोषिके असणार आहेत.

बालगट (वयोगट – ४ ते ६) पहिलीसाठी अंक उच्चार १ ते १०० असा स्पर्धेचा विषय आहे. दुसरी, तिसरीसाठी १ ते १० पाढे, ११ ते २० पाढे, २१ ते ३० पाढे असा स्पर्धेचा विषय आहे. चौथी, पाचवीसाठी पावकी, निमकी असा स्पर्धेचा विषय आहे. सहावी, सातवीसाठी पाऊणकी, सवायकी असा स्पर्धेचा विषय आहे तर आठवी, नववी, दहावीसाठी दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे. खुल्या गटामधे पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.