आठवडा विशेष टीम―
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधिचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे प्रा.गायकवाड यांनी आज माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा करतांना सांगितले.
अकरावी महाविद्यालय प्रवेश संदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच अकरावी महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे परंतु ऑनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे याबद्दल प्रा. गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास प्रा.गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
***