आठवडा विशेष टीम―
द्राक्ष बागायतदार संघटनेच्या प्रतिनिधींची डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले. कृषी संचालक दिलीप झेंडे, संचालक (विस्तार) श्री.मोटे, सांगली जिल्ह्याचे कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, संघटनेचे प्रतिनिधी मारुती चव्हाण, संदीप शिरसाळ, सचिन जाधव, संजय माळी, केशव चव्हाण, प्रकाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.कदम म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून द्राक्षाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तसेच यंदाही अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे द्राक्ष हंगाम लांबणीवर पडला आहे. तसेच ज्यांनी पूर्वहंगामी छाटण्या केल्या आहेत, अशा बागांमधील द्राक्ष घड बाहेर न पडल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बेदाणे उत्पादकांचेही नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर गंभीर परिस्थिती ओढावली आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन कृषी विभागाने अहवाल तातडीने शासनाकडे पाठवावा. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असे श्री.कदम यांनी सांगितले.
सांगलीमध्ये ऊर्वरित अंश तपासणीसाठी प्रयोगशाळा बांधणार
सांगली व परिसरातील जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात युरोपीयन देश व इतर देशात निर्यात होते. या निर्यातीसाठी या पिकांची कीडनाशके ऊर्वरित अंश तपासणीसाठी सांगली जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉ. कदम यांनी यावेळी दिले.
सांगली जिल्ह्यात 32 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन होते. सांगली जिल्ह्यामधून गेल्या वर्षी युरोपियन देशात 8484 मेट्रिक तर इतर देशात 9770 मेट्रिक टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. शेतमाल निर्यातीमध्ये विशेषतः सांगली जिल्ह्यातून द्राक्ष पिकाची दरवर्षी वाढ होत असल्यामुळे कीडनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा आवश्यक आहे. सध्या ही सुविधा पुणे येथे असल्यामुळे सांगली व परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे सांगलीमध्ये ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. तसेच त्यामुळे तपासणी अहवाल वेळेत मिळून द्राक्ष पिकाची निर्यात लवकर होणार आहे, असे डॉ.कदम यांनी यावेळी सांगितले.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/4.11.2020