‘मास्क नाही-प्रवेश नाही’ यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 5 : नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा व कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठी रंगभूमीदिनानिमित्त त्यांनी नाट्य निर्माते, कलाकार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय हे देखील सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, कोरोना नंतरच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीत आपल्या मागणीवर शासन नक्की विचार करेल. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे आपण म्हणतो पण आता पुढील काळात ते अत्यंत खबरदारीने टाकणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी लंडन आणि युरोपमध्ये कोरोनाचे संकट परत वाढले आहे याची जाणीव करून दिली.

चित्रपट आणि थिएटर यात फरक हा आहे की इथे रिटेक नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेकअप करावे, स्टेजवर कलाकारांनी अंतर ठेवावे, स्वच्छता ठेवावी. थिएटरमध्ये सुद्धा ‘नो मास्क नो एन्ट्री’ असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, बऱ्याच कालावधीनंतर नाट्यगृहे उघडतो आहोत. अनेक छोट्या मोठ्या समस्या येतील. आपण सर्वांनी बरोबर राहून यातून मार्ग काढू, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

यावेळी आदेश बांदेकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, अमेय खोपकर, प्रदीप कबरे, बिभीषण चवरे, डॉ.गणेश चंदनशिवे, प्रदीप वैद्य, प्रसाद कांबळी, यांनी चर्चेत सहभाग घेऊन काही सूचनाही केल्या.

0000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.