आठवडा विशेष टीम―
महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, जल जीवन मिशनच्या संचालक श्रीमती आर विमला, माविमच्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसुम बाळसराफ, माजी महापौर विशाखा राऊत, श्रीमती गीता कांबळी, श्रीमती संगीता हसनाळे, श्रीमती रंजना मेवाळकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, महिलांनी आता बचत गट आणि त्यांची पारंपरिक पापड, मसाले आदी उत्पादने याच्या पलिकडे जाऊन नवीन संधी शोधल्या पाहिजेत. महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादननिर्मितीची सांगड घालावी लागेल. त्यासाठी माविम, उमेदच्या (राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान) उपक्रमांना व्यापक स्वरुप देत महिलांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीचे कार्यक्रम अधिक गतीने हाती घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.
सेवाक्षेत्राची होत असलेली प्रचंड वाढ पाहता महिलांनी आता केवळ वस्तूनिर्मितीपर्यंतच मर्यादित न राहता सेवाक्षेत्रातील संधींकडे पाहिले पाहिजे, एनआरएलएमने ज्याप्रमाणे बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर टाकली आहेत तसेच माविम ज्याप्रकारे स्वत:चे ई- बिझनेस प्लॅटफॉर्म विकसित करत आहे त्याप्रमाणे महिलानिर्मित उत्पादनांना व्यापक प्रमाणात ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे, महिला बचत गटनिर्मिती वस्तू विक्रीसाठी ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर मार्ट उभारली जावीत, आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव श्रीमती स्मीता निवतकर यांनी महिला विकासाच्या योजनांची माहिती संकलित केलेली पुस्तिका यावेळी सादर केली.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.5.11.2020