आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ६ : सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारी व्यक्ती आढळून आल्यास कायदेशीर पद्धतीचा अवलंब करुन संबंधितास भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करुन घेण्यात येते. भिक्षेकऱ्याबाबत माहिती देऊ इच्छिणाऱ्यांनी संबंधित भिक्षेकऱ्याचे भीक मागतानाच्या छायाचित्रासह तारीख, शहर आदी माहिती [email protected] या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तांनी केले आहे.
महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1959 नुसार सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारे भीक मागताना आढळून आलेल्या व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र असून अशा व्यक्तींना न्यायालयाच्या आदेशाने भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करण्यात येते. भिक्षेकऱ्यांसाठी राज्यात महिला व बालविकास विभागांतर्गत पुरूष व महिला भिक्षेकरी यांच्याकरिता एकूण आठ भिक्षेकरी स्वीकार केंद्रे कार्यरत आहेत. आपल्या शहरात, गावात सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारी व्यक्ती आढळून आल्यास पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सदर व्यक्तीच्या भीक मागतानाचे फोटोसह, ठिकाण, शहर याबाबतची माहिती [email protected] या ईमेलवर पाठविण्यात यावी, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
0000