आठवडा विशेष टीम―
अमरावती, दि. 6 : महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील खानापूर येथील आत्महत्याग्रस्त अल्पभूधारक शेतकरी बांधवाच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
खानापूर येथील अल्पभूधारक शेतकरी तुषार अवघड यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी अवघड कुटुंबियांचे सांत्वन केले व या कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यंदा अतिवृष्टीने शेती क्षेत्रात अनेक अडचणी उभ्या राहिल्या. मात्र, शेतकरी बांधवांनी खचून जाता कामा नये. एक बहीण म्हणून मी अवघड कुटुंबाच्या पाठीशी राहीन व सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.