आठवडा विशेष टीम―
दीपावली म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी, असे समीकरण आहे. मात्र आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवे की, आज वातावरणातील प्रदूषणाचास्तर वाढला आहे. शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे आणि,वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे हवेच्या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच दीपावलीच्या फटाक्यांची आतिषबाजीने हवेचे व ध्वनीचे प्रदूषण प्रमाणात वाढते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फर डाय ऑक्साईड,कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड असे घातक वायू हवेत मिसळतात. अशा वायूंमुळे दीपावलीनंतर श्वसनाचे विकार, घशाचे आजार बळावताना पहावयास मिळतात. त्यातच या फटाक्यांमध्ये असलेले कोबाल्ट, निकेल, मॅग्नेशियम असे धातू पाण्यामध्ये मिसळल्यानंतर त्यातून मोठे प्रदूषण होते.
दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांच्या ध्वनीची पातळी मोजली जाते आणि ज्या फटाक्यांची ध्वनीपातळी विहीत मर्यादेपेक्षा जास्त असते. त्याबाबतची माहिती पेस्को (नागपूर) पेट्रोलियम आणि एक्सप्लोजिव्ह विभाग यांना कळविली जाते. दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यातील प्रमुख शहरातील 150 पेक्षा जास्त ठिकाणी दिपावली उत्सवात ध्वनीची पातळी मोजण्यात येते. मागील तीन वर्षात फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाल्याने ध्वनीच्या पातळीत घट होत आहे.
००००