इंटरनेट सेवा काळाची गरज; लॉकडाऊन काळात इंटरनेटचा प्रभावी वापर

आठवडा विशेष टीम―

सिंधुदुर्गनगरी दि. 07: इंटरनेट सेवा ही आता आधुनिक काळाची अत्यावश्यक गरज झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा प्रभावी वापर करून विध्यार्थ्यांनी शिक्षण घेतले, त्यामुळे इंटरनेट सेवा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

लोरे नं.१ येथील बीएसएनएल टॉवर लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, बीएसएनएल जिल्हा प्रबंधक एस.आर. मंजे, बीएसएनएल मंडळ अधिकारी देवलीकर, जि. प. सदस्य नागेंद्र परब आदी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कोविड-19 च्या काळात इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. त्यामुळे आता मोबाईलवर शिक्षण काळाची गरज झाली आहे. पण ग्रामीण भागात मोबाईलसाठी इंटरनेटची रेंज मिळत नाही. यासाठी टॉवर उभारणीची कामे सुरू झाली आहेत. त्याचबरोबरच ग्रामीण भागात विकासाची कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. लोरे गावच्या मागणीनुसार रस्ते, कालवा याची कामे करण्यात येतील.लोरे गावातील विहीर जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी लोरे येथील तलावाच्या कामाची पाहणी करून सदरचे काम तातडीने पुर्ण करण्याचे आदेश दिले.

खासदार विनायक राऊत म्हणाले, जिल्ह्यात व्यवस्थित मोबाईल रेंज मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून 104 मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 66 टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टॉवरही लवकरच सुरू केले जातील. त्याच बरोबर लोरे फोंडा या भागाचा विकास करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

पालकमंत्र्यांनी केली कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी

पालकमंत्री उदय सामंत यांनी कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन जिल्हा नियोजन समितीच्या 1 कोटी निधीतून बांधण्यात येत असलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी हे काम खारे वातावरण व अतिपावसाचा विचार करून बांधण्यात यावे. कामाचा दर्जा चांगला ठेवावा. या कामाची पाहणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी भेट देऊन करावी व त्या बाबतची माहिती सादर करावी, असे आदेश त्यांनी दिले. तसेच कुंभवडे येथील मोबाईल टॉवरचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

पालकमंत्र्यांकडून दिरबादेवी रस्त्याची पाहणी

पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगवे ता.कणकवली येथील दिरबादेवी रस्त्याची पाहणी करून हा रस्ता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कंत्राटदाराने विहित मुदतीत हा रस्ता पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लक्ष द्यावे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, यामध्ये कोणतीही कुचराई करू नये. अन्यथा संबंधितत अधिकारी व कंत्राटदार यांना जबाबदार धरले जाईल अशी सूचना यावेळी दिल्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.