रोपवाटिकेमुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी : कृषिमंत्री दादाजी भुसे

आठवडा विशेष टीम―

मालेगाव, दि. 7: महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पध्दतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. उत्पादित होणाऱ्या मालाची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. गेल्या २ ते ३ वर्षापासून भाजीपाला पिकांचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्या दृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार तसेच कीड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे. याच उद्देशाने शासनामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरु करण्यात येत आहे. याच रोपवाटिका शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देतील, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

मंत्री दादाजी भुसे यांनी दत्तक घेतलेल्या तालुक्यातील सातमाने गावात यशवंत ॲग्रो हायटेक नर्सरीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, सेवानिवृत्त कर्नल अमित दळवी, दिलीप हिरे, लोटन शेवाळे, प्रगतशील शेतकरी प्रमोद निकम, निळकंठ निकम, दिपक देवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेस राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा मी दत्तक घेतलेल्या सातमाने गावात शुभारंभ करताना विशेष आनंद होत असल्याचे सांगत मंत्री श्री.भुसे म्हणाले, राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. किमान एक लक्षांक प्रत्येक तालुक्यास देण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोगमुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे, पिक रचनेत बदल घडवून आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे हा उद्देश असून तो नक्कीच सफल होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम व समृध्द होवून त्यांना मान, सन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या उद्देशाने मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या जिव्हाळ्याच्या व जबाबदारीच्या कृषी खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. या जबाबदारीला न्याय देण्यासाठी कृषी विभाग अहोरात्र झटत आहे. मालेगावचे नाव राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडून बळीराजाला सक्षम व समृध्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.