१९ नोव्हेंबरपासून राज्यात ‘कौमी एकता सप्ताह’

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 11 : राज्यात येत्या 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान ‘कौमी एकता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सामाजिक सौहार्द वाढविण्याच्या दृष्टीने सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

या सप्ताहांतर्गत गुरूवार 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जाईल. यामध्ये धर्मनिरपेक्षता, जातीयवाद विरोध व अहिंसा यावर भर देणाऱ्या सभा, चर्चासत्रे व परिसंवादाचे ऑनलाईन किंवा वेबिनारद्वारे आयोजन करण्यात येईल. शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा केला जाईल. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा, तसेच कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शनिवार 21 नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवस साजरा करण्यात येईल. भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारशाचा परिचय करुन देण्याच्या दृष्टीने ऑनलाईन किंवा वेबिनारद्वारे विशेष वाङमयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात येतील. रविवार 22 नोव्हेंबर रोजी दुर्बल घटक दिवस साजरा करण्यात येईल. यामध्ये 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने ऑनलाईन किंवा वेबिनार आयोजित करण्यात येतील. सोमवार 23 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक एकता दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मतेसंबंधीची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. मंगळवार 24 नोव्हेंबर हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येईल. भारतीय समाजातील महिलांचे महत्त्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. बुधवार 25 नोव्हेंबर हा जोपासना दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. सर्व कार्यक्रम आयोजित करताना केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-19 च्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातून ही शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात यावा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा प्रांगणात सामाजिक अंतर ठेवून शपथ घ्यावी. तसेच भित्तीपत्रके, फलक यांच्यावर ठसठशीत असे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिकचिन्ह प्रदर्शित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसेच स्वयंसेवी संस्थांनी करावयाचे कार्यक्रम त्यांच्या सोयीने करण्याची त्यांना मोकळीक आहे.

याबरोबरच केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने कौमी एकता सप्ताहामध्ये ‘सांप्रदायिक सदभावना मोहीम निधी संकलन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर, 2020 रोजी ‘ध्वजदिन साजरा’ करण्यात येणार आहे. ध्वजदिनाचा निधी संकलित करण्याकरिता व संकलित केलेला निधी राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्याकडे सुपूर्द करण्याकरिता अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.